Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

एक प्रेमपत्र...


प्रिय सखी,
         काय लिहू आणि काय नको अस झालं आहे मला,सुरुवात कुठून करू? हा माझा नेहमीचा प्रश्न .तू आठवलीस कि फक्त तुझे डोळेच दिसतात आणि नंतर सगळं अस्पष्ट होत जातं.मन माझं मग तुझ्या आठवणीत हरवून जातं.काही सुचत नाही.काही कळत नाही.फक्त मी,तू आणि आठवणी.आपलं ते रोज भेटणं,कारण काहीच नसायचं.फक्त एक झलक तुझी दिसावी एवढंच!! म्हणून मी प्रत्येक दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघायचो आणि तुझ्यासमवेत असलो कि ,तू एकटी बोलायचीस आणि मी मात्र फक्त तुला बघत बसायचो .किती खुष राहायचो आपण,आज इकडे फिरा,उद्या तिकडे फिरा.जगाची जशी काय पर्वाच उरली नव्हती दोघानाही ! तुझं माहित नाही पण मला नक्कीच नव्हती .पर्वा आणि जगाची,जग गेलं उडत .......
          तू कशी आहेस ?माझ्यासारखी आतुर झालीस का ग भेटायला.माझ्या इतकी नक्कीच नसशील ,मी अतिशय वाट बघतोय तुझी,आताही ही चिट्ठी,तू वाचत असताना,केस मोकळे सोडले असशील ना?, उगाच प्रत्येक शब्द परत परत वाचत असशील ना ?आठवणींनी इतकी गर्दी केली आहे कि मला त्यातून बाहेर पडता येतच नाही.फक्त पाणी येत डोळ्यात कधी कधी,आणि मन भिजत राहतं.
          उगाचच आपण फिरलेलो त्या जागावर जाऊन,घालवलेले क्षण मी गिरवत बसतो. किती वेळ माझा जातो,त्याचा मला पत्ताच नाही.एक आठवण संपली कि दुसरी आठवण,ती झाली कि तिसरी .....आपण बसायचो त्या जागेवर कोणतरी दुसरं बसलेलं असतं.त्यातल्या मुलीकडे बघतो आणि मी मनातच हसतो कारण तुझ्यापेक्षा सुंदर ती नसते ना म्हणून ! पाणीपुरी खाताना रंगलेलं तुझं तोंड आणि तिखट झाल्यावर नाकातोंडातून बाहेर पडणारी पाणीपुरी आठवली कि पटकन हसायला येत आणि मग तू जास्तच आठवतेस .ट्रेनच्या दरवाज्यावर उभं राहून जायची सवय मी कधीच मोडली.आता त्यात काही मजा येत नाही.कदाचित तू नसतेस म्हणून .हो म्हणूनच आता मजा येत नाही .नाहीतर आपण कसे उभे राहायचो,एकमेकांच्या अगदी जवळ,जोरात येणारा वारा खात,वेगळ्याच जगात मस्त..... किती मजा यायची ना तेव्हा !
         तुझ्या चिठ्ठ्या मी जपून ठेवल्या आहेत.आणि परत परत वाचतो,चिठ्ठी लिहिताना रडत असावीस नाहीतर उगाच “ल” चा “ळ” होत नाही आणि पूर्णविरामाची टिकली होत नाही.माझंही काहीसं असंच होत,मला तर चिठ्ठी वाचतानाही रुमाल जवळ ठेवावा लागतो.
        मी असं लिहीत बसलो तर माझी वही संपेल आता पुरे करतो ,स्वताची काळजी घे आणि लवकर लवकर लवकर परत ये माझ्याकडे ...................:)
                                                                         तुझाच मी   


No comments:

Post a Comment