Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, December 29, 2011

मन.....

मन माझे वेडे पिसे,
भटके पाखरू पाखरू ,
सांग प्रेमात तुझ्या मी,
कसे स्वतःला आवरू,

मन सखे हरवले,
तुझ्या प्रेमात प्रेमात,
घेई चांदण्या कुशीत,
निळ्या नभात नभात ,

मनी आठवणी रुजती,
क्षणापुर्वीच्या भाबड्या,
झरे डोळ्यांना फुटती,
मिठीत एकांताच्या,

मनात या उमटली,
लहर ती स्वप्नांची ,
मावळत्या नजरातही,
तळमळ त्या रात्रींची,

मनी खेळ भावनांचा,
सुख दुःखाचा लपंडाव,
भरारी ती आनंदाची,
न लागे याचा ठाव,

मन असे छापखाना,
कधी उघडूनी पहा,
मनाच्या कोरीव भागावर,
काही कोरूनही ठेवा,

मन जाणे तुझे मला,
शब्द अबोल अबोल,
भारावूनी गेलो दोघे,
प्रेमाचे नवल नवल,  


Tuesday, December 27, 2011

रहस्य...


त्या दिवशी अचानक,
डोळ्यात पाणी आलं,
आईने कारण विचारलं,
भूक लागली समजून,
तिने भाकरी भाजून दिली,
मग बायकोचं येणं झालं,
आयुष्यात नाविण्यासहित,
परत एकदा तसंच, 
डोळ्यात पाणी आलं,
यावेळीही प्रेमाची भूक भागली,
पण ते समाधान नव्हतं,
मायेच्या उबेची गरज होती,
प्रेम ,माया सारखंच असतं,
मनाला ते कळत नाही,
आयुष्यात मायेची जागा ,
प्रेम कधीच घेऊ शकत नाही,
हे सत्य मी जाणलं,
त्या अचानक येणाऱ्या पाण्याचं,
रहस्य आज मला कळलं

Tuesday, November 29, 2011

मित्र...

फळांनी भरलेल्या फांदीला,
एखादं निरागस फुल असावं,
तसं तुझं असणं,
माझ्या आयुष्यात सुगंध बनून,

पावसाच्या एखाद्या,
चुकलेल्या थेंबाचं अस्तित्व माझं,
अन् त्यालाही मनात आसरा देण्याचं,
मोठेपण रुजावं......  
तसं तुझं असणं,
 माझ्या आयुष्यात पाऊस बनून,

गोंधळलेली एखादी वाट असावी,
काळोखात न्हालेली तसा मी,
त्या काळोखातही प्रकाशित होण्यास,
प्रेरित करावं........
तसं तुझं असणं,
  माझ्या आयुष्यात चांदणं बनून,

पंख असूनही,
आभाळाची भीती ठेवणारा हतबल मी,
त्याच आकाशात ध्येय शोधून,
यशाचा मार्ग मिळावा......
तसं तुझं असणं,
  माझ्या आयुष्यात गुरु बनून,

अस्तित्वाला माझ्या,
माझंच असणं नसावं तसा मी,
नसण्याला माझ्या,
स्वताच्या असण्याने पूर्ण करावं..
तसं तुझं असणं,
        माझ्या आयुष्यात माझं असणं बनून....
..........एक मित्र म्हणून ......    

Monday, October 17, 2011

आई...

सावली तुझी आयुष्य त्याचं ,
मार्ग तुझे अस्तित्व त्याचं ,
रात्रीत तुझ्या टीमटीमणं त्याचं,
आईच असते काळीज मुलाचं,

अश्रू तुझे रडणं त्याचं ,
गोंजारताच तू हसणं त्याचं,
झोप तुझी स्वप्न त्याचं,
नात हे प्रेमळ मनांचं

वसंत तू मोहरणं त्याचं ,
पाऊस तू खिदळणं त्याचं,
प्रवाह तू खळखळणं त्याचं,
तुमच्या बागेत फुलणं देवाचं,

गंध  बनून चोहीकडे  दरवळणारी तू ,
पहिलाच  प्रेमाचा घास भरवणारी तू,
सौख्य तू आयुष्याचं समाधान तू ,
दयेचं, जिव्हाळ्याचं सुखमंदीर तू ,

चराचरावर प्रेम करण्याची,
जेव्हा देवाला झाली घाई,
प्रत्येक मुखातून एकच हाक आली,
आई..आई..आई   

  

Thursday, October 13, 2011

तुला आठवणं...

रातकिड्यांचे स्वर.
सावल्यांची कुजबुज,
चांदण्याचं टीमटीमणं,
चंद्राची हुरहूर,
तसं तुला आठवणं  

माझ्यात खोलवर रुजणं,
मला मिठीत घेणं,
हलकसं गोंजारण,
स्पर्शांच मोकाट चालणं,
आवडतं तुला आठवणं

कळ्यांच फुलणं,
फुलांचं दरवळणं ,
वाऱ्याचं खळखळणं ,
झऱ्याचं झरणं ,
तसं तुला आठवणं  

सरींचं गीत गाणं,
पावसाचं त्यात बरसणं ,
थेंबाना गालावर झेलणं ,
ओठांचं अधीर होणं,
तसं तुला आठवणं  

गवताचं  नादात डोलणं ,
दवाचं पात्यावर नाचणं,
फुलपाखरांच मनसोक्त बागडणं ,
पक्षांचं किलबिलणं ,
  तसं तुला आठवणं    

Wednesday, October 12, 2011

अस्तित्व...


नष्ट करून टाक ती मळबट,
माझं तिचं खोटं गुज प्रेमातलं,
साधसूदं मन वेडं माझं,  
लोभस भावनांत अडकलेलं,
संपवून टाक सगळं तिचं,
रुजलेलं अस्तित्व माझ्यातलं,

अश्रूंच्या आठवणी नको आता,
नको ते जीवन विश्वास घातातलं,
काहीच नाही माझ्याकडे गमवायला ,
राहिलंय सुखं ते आयुष्यातलं,
संपवून टाक सगळं तिचं,
रुजलेलं अस्तित्व माझ्यातलं,

मैत्री तिची नको मला ,
नको ते नातं  दिखाव्यातलं ,
नको मला हे आयुष्यंच,
तिच्या फसव्या सहवासातलं,
संपवून टाक सगळं तिचं,
रुजलेलं अस्तित्व माझ्यातलं,
                                                    
रे थेंबा वाहावून घेवून जा मला,
पुरेपूर  तिच्यातलं,
वादळात जाळून टाक आवेगात ,   
तिला पूर्णत्वे मनातलं ,
संपवून टाक सगळं तिचं,
रुजलेलं अस्तित्व माझ्यातलं,

प्रेमावर विश्वास माझा ,
सत्व त्यात पवित्र स्वर्गातलं  ,
मनुष्यानेच बदलली चव ,
खुलेआम नकोतंस लुबाडलं,
संपवून टाक सगळं तिचं,
रुजलेलं अस्तित्व माझ्यातलं,

Friday, September 30, 2011

वचन


प्रेमाच्या दुनियेत काय ,सुखा समाधानाची नशा ,
पदरात शेवटी माझ्या ,आनंद आनंद  

नजरेतसे तिच्या मी ,माझ्या मुखी सर्वसुख ,
चराचरातसे  इर्षा ,प्रेमाची तिच्या माझ्या ,

स्पर्श अबोल बोलके ,होतसी अनायसे,
चंचल मन माझे,तिच्या गालातही दिसे,

इशारा एक तिचा ,रोमांच अंगी माझ्या  .
उमलली कळी नाजूक ,ओठावरी अनाहुत,

विरह तुझा सखे ,प्रेमानेच  फुलवला ,
कुस्करले जरी सारे, गंधात तू उरीच्या ,

नशीब काय ते सखे,म्हणावे यासी का ग वेडे ,
जन्म जन्मांतीची साथ, द्यायची तुला होती,

दूर जाऊनी गवसले ,महत्त्व मला प्रेमाचे
रहा जवळी माझ्या,भास नको दुराव्याचा ,

सखे देईन मी तुला,पाझर ही मनातला,
हौस प्रत्येक मनीची ,पुरेपूर भागविन,

फुलासारखी सखी माझी ,फुलासारखी जपेन ,
बागेत या तुझ्या, भुंगा बनून राहीन......तुझा होऊन जाईन  

Monday, September 26, 2011

अर्थ...

लहर होती पावसाळी ,
कातरवेळ ही आसुसलेली ,
चातकापरी  थेंबांना  .
अर्थ आज नवा होता.

मावळतीला सूर्यकिरणे ,
चंद्र होता उगवतीला ,
सावल्यांकडे चांदण्यांचा,
अर्थ आज नवा होता ,

कुजबुजती शांत वाटा ,
वळणांचा लपंडाव होता ,
पावलांमध्ये चालण्याचा ,
आवेग हृदयी नवा होता ,

विखुरलेले जीवन सारे,
नवे बाकी जुनेच होते ,
हसण्याचा हट्ट मनाचा .
नयनी माझ्या नवा होता ,

धुक्यामध्ये शोधताना,
गवसलेला हरवला होता ,
निराश मनी आशा दाटलेली,
रंग तिचा नवा होता ,

रडणे रडणे फार झाले ,
अश्रूंना कुठे तुटवडा होता ,
गाली फुसकुली आसवांची ,
खेळ चेहरी नवा होता ,

चेहऱ्यावरती तेज माझ्या ,
आनंद जणू बहरलेला ,
आसमंती उधळला मी,
पसारा त्याचा नवा होता..