क्षणभंगुर जीवन आपुले
क्षणातच बदलून जाई
क्षणात सुखे क्षणात दुःखे
अन् क्षणातच बहरून जाई
जीवनाच्या पडद्यावरती
निरनिराळे रंग पसरती
सुखाच्या मोहक चित्रामध्ये
दुःखाची किनारही विसरती
आयुष्याच्या वेलीवरती
वेगवेगळी फुले उमलती
ऋणानुबंधाच्या भोवऱ्यात
मावळूनही परत फुलती
अनेक क्षणांचे नाते
तुटते एका क्षणात
शोधिते आधार वेडे
एक मन दुसऱ्या मनात
जीवन आपुले जीवनासारखे
मुठीतुनही निसटते
वाऱ्यावरती स्वार होऊन
इकडे तिकडे भरकटते
क्षण येती क्षण जाती
क्षण अळवावरचे मोती
क्षण येती क्षण जाती
उभ्या आयुष्याचे साथी
- संकेत गुजर
No comments:
Post a Comment