Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, November 1, 2010

दुर्लक्षित

शोधू कुठे स्वत:ला ,तूच ओळखत नाहीस तर ,
नाव ,गाव ,पत्ता ,काय सांगू ,दुर्लक्षित जर मी आहे तर,

नाकावर घेशी रुमाल,बघताच क्षणी मला ,
नजरे बरोबर पाठही फिरवतोस ,का असे तू वागला?,

अरे हाडामासाचीच आहे, जात तुझी माझी ,
न भेदिला देवाने ,मग तू का भेदिला मला ? ,

वाटे मज बोलावेसे ,न बोलीशी तू तरी ,
असेल काम तर सांग रे, न तू तेही सांगीशी ,

मनी उमटती भाव माझ्या, न वेगळे तुज परी,
अवहेलना का अशी , करिशी दुर्लक्ष मज पाशी ,

तोच मी गर्दीतला ,तू बघितला न बघितला ,
प्रवासी असूनही सोबतीचा ,खिडकीबाहेरच नजरांना टांगलेला ,

जवळ यावेसे वाटे मनी, नजरा तुझ्या हेटाळती ,
किती दुख्ख याचे मनी , नसेलही तुला माहिती ,

न सावळी आवडे तुला, न आवडे नजर माझी ,
भंगलेला संसार माझा ,न सहानुभूती तुज डोळांती ,

असे तुज पाशी सर्व, म्हणायला आयुष्य तरी ,
येत्या क्षणी पोटाचे काय ,न मला काळजी उद्याची ,

पेटवशील तर जळेन मी ,जळे घाम माझा इंधन म्हणून ,
न जाणे शरीरात काय, रक्त वाहे खारट बनून,

मागीशी काय तू देवापाशी ,संसाराचे सुख जणू ,
असा जन्म नको कुणा ,मी रोजच करतो देवा म्हणू ,

दुखतं ,खुपतं,मलाही,वाहे झुळझुळा डोळ्यातून ,
नाजूक मनाचा मानकरी ,कसा निसटला तू जाणीवेतून ,

मदत नको करूस तू ,होत नसेल तुझ्याने तर ,
तीळ तीळ मारे हेटाळणी ,जमल्यास तू ते बंद कर ,

भिकारी नाही मी, थोडासा गरीबच आहे ,
वेडा नाही मी, जो मनी तुझ्या राग आहे ,

ज्यात काही स्वार्थ नाही ,असे माझे जग आहे ,
प्रेमझरा वाहे निरंतर , माणुसकी तरी त्यात आहे ,

झालोय जणू दुर्लक्षित ,तुमच्यापैकी एक मीही ,
मिठीत मला घेऊ नका ,नको तिरस्काराची जाणीवही.................


No comments:

Post a Comment